
तळोदा:(तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो. 9689840855)गणेशोत्सवानिमित्त श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने शेठ के. डी. हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल १९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत विद्यार्थ्यांची वयोगटानुसार विभागणी करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, माझा आवडता सण, भारतीय संस्कृती आदी सामाजिक व प्रबोधनात्मक विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची साथ देत आकर्षक चित्रे साकारली. विविध विषयांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली नाही, तर सामाजिक विषयांकडे सर्जनशीलतेने पाहण्याची प्रेरणाही मिळाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे असे विधायक उपक्रम सातत्याने होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेठ के. डी. हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एल. सूर्यवंशी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. मंडळाच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.









