विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन; जनजागृती रॅलीसह विद्यार्थ्यांनी घेतली फार्मासिस्टची शपथ
शहादा : जागतिक स्तरावर २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात “आरोग्यदायी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण” (Empowering Pharmacists for Healthier Futures) या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, सर्जनशीलतेला आणि सामाजिक बांधिलकीला चालना देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय रिल्स मेकिंग स्पर्धा, सायट्यून्स (विज्ञान व्यंगचित्र) मेकिंग स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, फार्मा चॅम्पियन क्विझ स्पर्धा-२०२६, तसेच संस्थास्तरीय हर्बेरियम शीट मेकिंग आणि स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
रिल्स मेकिंग स्पर्धेत शहाद्याच्या विद्यार्थ्याची द्वितीय क्रमांकाची कामगिरी
“Combating Antimicrobial Resistance” या विषयावर राज्यस्तरीय रिल्स मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुणे येथील डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसीचे सुरवसे प्रशांत व निकम गौरव यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील पाटील यश याने द्वितीय क्रमांक पटकावला.
विज्ञान व्यंगचित्र स्पर्धेत शहाद्याच्या विद्यार्थिनींचे वर्चस्व
“Combating Antimicrobial Resistance” या विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सायट्यून्स (विज्ञान व्यंगचित्र) मेकिंग स्पर्धेत शहादा महाविद्यालयाची चौधरी हर्षदा सुपडू हिने प्रथम क्रमांक मिळवला. थोरात शुभांगी हिने द्वितीय, तर भावसार वैष्णवी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये शिरपूर व शहादा महाविद्यालयांची उल्लेखनीय कामगिरी
राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत “निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण”, “एएमआर रोखण्यात फार्मासिस्टची भूमिका” तसेच “अदृश्य औषधनिर्माता : पडद्यामागे राहून फार्मासिस्ट आरोग्याचे रक्षण कसे करतात” या विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केले.
या स्पर्धेत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या वाघ दिव्या शरद व कोळी स्नेहा सुनील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या चंदेल पूर्वा हरिश्चंद्र व खाटीक इरम इफ्तेखार यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूटच्या महाजन पियुष संजय व महाजन मानसी प्रकाश यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
फार्मा चॅम्पियन क्विझमध्ये पुणे व कर्जतच्या विद्यार्थ्यांची बाजी
“आरोग्यदायी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण” या थीमवर राज्यस्तरीय फार्मा चॅम्पियन क्विझ स्पर्धा-२०२६ घेण्यात आली. या स्पर्धेत पुणे येथील डिलाइट कॉलेज ऑफ फार्मसीच्या पालवे तन्वी बाबासाहेब यांनी ६ मिनिटे १० सेकंदांच्या वेळेत प्रथम क्रमांक मिळवला. पुणे येथील पी.सी.ई.टी. युनिव्हर्सिटी, स्कूल ऑफ फार्मसीच्या देवासी रिंकू हरीराम यांनी ६ मिनिटे १४ सेकंदांत द्वितीय क्रमांक मिळवला. तर कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कांकरिया कुणाल जयंती यांनी ६ मिनिटे ५४ सेकंदांत तृतीय क्रमांक पटकावला.
हर्बेरियम व घोषवाक्य स्पर्धेतही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
संस्थास्तरीय हर्बेरियम शीट मेकिंग स्पर्धेत शहादा महाविद्यालयाच्या चव्हाण दिशा सुनील यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कोळी हेमराज जगन्नाथ यांनी द्वितीय, तर खाटीक इफत फातेमा शाकीर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच “अमली पदार्थमुक्त परिसर – Drug Free Campus” या विषयावर स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिंदे रोहिणी भरत यांनी प्रथम, घोडराज प्रेरणा प्रवीण यांनी द्वितीय, तर वाडीले प्रिया गोरख यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना १ हजार रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ७०० रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ५०० रुपये व प्रमाणपत्र ऑनलाइन प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
जनजागृती रॅलीतून फार्मासिस्टच्या भूमिकेचा संदेश
विविध स्पर्धांनंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून आरोग्य, औषधांचा योग्य वापर, फार्मासिस्टची भूमिका आणि समाजातील जनजागृती याबाबत संदेश देण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘RX’ची मानवी साखळी साकारली. या उपक्रमातून औषधनिर्माण क्षेत्राचे महत्त्व आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये फार्मासिस्टची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी घेतली फार्मासिस्टची शपथ
कार्यक्रमाच्या समारोपाच्या टप्प्यात महाविद्यालयातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. पाटील अदिती योगेश हिने महाविद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना फार्मासिस्टची शपथ दिली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे परिश्रम
या कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री. जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक श्री. मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. माधुरी पवार, प्रा. मोहिनी पाटील, प्रा. जयश्री चव्हाण, प्रा. निखिल पाटील आणि प्रा. अंजली पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवृंदाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.










