तळोदा (प्रतिनिधी) : तळोदा तालुक्यातील आमलाड गावात “पोर पकडणाऱ्या टोळी”च्या अफवेमुळे गुरुवारी सायंकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला. अफवांवर विश्वास ठेवत संतप्त जमावाने संशयित तिघा तरुणांना बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनालाही आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, आमलाड गावातील शासकीय मुलांच्या वस्तीगृह परिसरात काही अनोळखी तरुण फिरत असल्याची चर्चा पसरली. त्यानंतर “पोर पकडणारी टोळी आली आहे” अशी अफवा वेगाने गावभर पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी त्या तरुणांना अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच जमावाने संताप व्यक्त करत तिघांवर हल्ला चढवला.
या मारहाणीत तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने त्या तरुणांचे चारचाकी वाहन पेटवून दिले. वाहनाला लागलेल्या आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात जमावाने संशयितांना मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत गावात बंदोबस्त वाढवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अफवा पसरवणाऱ्यांवर तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.









